Get Mystery Box with random crypto!

मराठवाड्यात मॉन्सूनची प्रगती सौजन्य : अॅग्राेवन दिनांक : 1 | कृषिक अँप Krushik app

मराठवाड्यात मॉन्सूनची प्रगती

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 16-Jun-22
पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) मजल-दरमजल प्रवास सुरूच आहे. मॉन्सूनने बुधवारी (ता.१५) मराठवाड्याच्या आणखी काही भागात प्रगती केली आहे. शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
दहा जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल झाला. तर सोमवारी (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठत निम्मा महाराष्ट्र व्यापला. तर बुधवारी (ता. १५) दक्षिण भारतातील राज्यांमध्ये प्रगती करत मराठवाड्याच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला.
मॉन्सूनने संपूर्ण कर्नाटक, रायलसीमा आणि तमिळनाडू व्यापून, तेलंगणा, सिमांध्रच्या काही भागासह बंगालच्या उपसागरातही प्रगती केली आहे. तर वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत (ता. १८) मॉन्सून विदर्भाच्या काही भागासह तेलंगाणा, सिमांध्रचा आणखी काही भाग, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील पोचण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
विदर्भ, मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता : राज्याच्या निम्म्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. या भागात ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १६) विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
पूर्व उत्तर प्रदेशापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. उत्तर अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून कच्छ, नैर्ऋत्य राजस्थानपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. विदर्भासह पूर्व भारतातील राज्यात पूर्वमोसमी पावसाच्या ढगांची दाटी झाली आहे.
राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू आहे. बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात काही ठिकाणी तापमान अद्यापही चाळिशीपार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात पावसाने दडी मारली असली तरी मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे.
बुधवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत राज्याच्य�� विविध भागांत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : श्रीवर्धन, रत्नागिरी प्रत्येकी १०
मध्य महाराष्ट्र : इंदापूर २०, सांगोला १०
मराठवाडा : कळमनुरी ४०, केज, औसा, बीड प्रत्येकी ३०, रेणापूर, सोनपेठ प्रत्येकी २०. धारूर, ओंढा नागनाथ, हदगाव, लातूर, उमरी, शिरूर अनंतपाळ, जाफराबाद प्रत्येकी १०
विदर्भ : रिसोड, अमरावती प्रत्येकी ३०, नरखेडा, झारीझामणी, राळेगाव प्रत्येकी २०, वरूड, चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, मंगरूळपीर, ब्रह्मपुरी, तिवसा, रामटेक, घाटंजी, देवळी, उमरेड, सिंदखेडराजा, पांढरकवडा, पारशिवनी, भातकुली, मौदा, गोंडपिंपरी, कोर्पणा, आर्वी, दारव्हा, चांदूर रेल्वे प्रत्येकी १०
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en