Get Mystery Box with random crypto!

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान सौजन्य : अग्रोवन दिनांक : 20 | कृषिक अँप Krushik app

पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान

सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 20-May-22
पुणे : राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरू असल्याने उन्हाचा चटका पुन्हा कमी झाला आहे. बहुतांशी ठिकाणी तापमानाचा पारा ४४ अंशांच्या खाली आला आहे. यातच राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला येथे ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित राज्यात तापमान ३० ते ४३ अंशांच्या आसपास होते. राज्यात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असून, ढगाळ हवामान होत आहे. यातच अनेक ठिकाणी जोरदार वारे वाहत आहेत. परिणामी, कमाल तापमानात घट होत आहे. आज (ता. २०) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता आहे.
तमिळनाडू आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. मराठवाड्यापासून अंतर्गत कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यातच मर्तबनचे आखात आणि म्यानमारजवळच्या समुद्रात चक्राकार वारे वाहत असून, या भागात आज (ता. २०) कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.
गुरुवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३८.१, धुळे ४२.६, जळगाव ४२.४, कोल्हापूर ३२.६, महाबळेश्‍वर ३०.९, नाशिक ३७.३, निफाड ३८.८, सांगली ३७.४, सातारा ३८.२, सोलापूर ४०.७, सांताक्रूझ ३४.२, डहाणू ३३.७, रत्नागिरी ३३.४, औरंगाबाद ४१.१, परभणी ३८.८, नांदेड ३९.२, अकोला ४४.१, अमरावती ४३.२, बुलडाणा ४०.४, ब्रह्मपुरी ४२.८, चंद्रपूर ४२.४, गोंदिया ४२, नागपूर ४१.८, वर्धा ४२.८, यवतमाळ ४१.
मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांची (मॉन्सून) वाटचाल वेगाने सुरू आहे. सोमवारी (ता. १६) अंदमानात दाखल झालेल्या मॉन्सूनने बुधवारी (ता. १८) संपूर्ण अंदमान-निकोबार बेटसमूह व्यापला. बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात मॉन्सून दाखल झाला आहे. उद्यापर्यंत (ता. २१) बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह, दक्षिण अरबी समुद्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en