Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला भुईमुग भुईमूग काढणीमध्ये दोन महत्वाची कामे अ | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
भुईमुग
भुईमूग काढणीमध्ये दोन महत्वाची कामे असतात; भुईमुगाचे झाड उपटणे आणि उपटलेल्या वेलीच्या शेंगा तोडणे. भुईमूग काढणी करतेवेळी जमिनीत पुरेसा ओलावा किंवा वाफसा स्थिती असल्यास वेली शेंगासह उपटून काढणी करता येते. मात्र, जमीन कडक झाली असल्यास बैलचलित किंवा ट्रॅक्‍टरचलित अवजारांचा वापर करता येतो. त्यामध्ये पास किंवा भुईमूग काढणी यंत्र उपलब्ध आहेत. शेंगा तोडण्यासाठी विविध वाणाप्रमाणे, ठिकठिकाणी विविध प्रकार अवलंबविले जातात. उपट्या वाणांमध्ये उपटलेले वेल हिरवे असतानाच शेंगा हाताने तोडून किंवा पासेवर वेल आपटून वेलीपासून वेगळ्या केल्या जातात. शेंगा वेगळ्या करण्यासाठी स्ट्रिपर्स उपलब्ध आहेत. ते मजुरांकरवी किंवा यंत्राद्वारे चालतात. पसरणाऱ्या वाणांमध्ये काढणी केलेले वेल वाळवून त्यापासून काठीने ठोकून शेंगा वेगळ्या केल्या जातात. उफणणी यंत्राने शेंगा वेगळ्या केल्या जातात.
भुईमूग काढणी करतेवेळी शेंगामध्ये ४० ते ५० टक्के ओलावा असतो. काढणी केलेल्या शेंगा वाळवून त्यातील ओलावा १० टक्क्यांपर्यंत कमी करावा. यामुळे शेंगा साठवणुकीमध्ये सुरक्षित राहतात. उन्हात शेंगा वाळविणे ही चांगली व सोपी पद्धत आहे. शेंगामध्ये बुरशी वाढू नये, म्हणून शेंगा लवकर वाळवाव्यात. मात्र उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा बियाण्यासाठी घेतल्या असतील, तर त्या उन्हात वाळवू नयेत. अन्यथा बियाण्याची उगवणशक्ती कमी होते.
सुर्यफुल
सूर्यफूल बियांत साधारणतः ३५ ते ४५ टक्के तेलाचे प्रमाण असते. तेलामध्ये भरपूर प्रमाणात स्निग्ध पदार्थ, प्रथिने, खनिज पदार्थ, जीवनसत्व ‘अ’ आणि ‘ई’ असते. तेलामध्ये ६८ टक्‍के लिनोलिक आम्ल, तर २० ते ४० टक्के ओलिक आम्ल असते. तेल काढण्याची प्रक्रिया करण्यापूर्वी बियांमधील फोलपट काढून टाकणारे यंत्र म्हैसूरच्या अन्न तंत्रविज्ञान संस्थेने तयार केले आहे.
उप उत्पादन म्हणून मिळणाऱ्या सूर्यफूल पेंडीचा उपयोग मानवी खाद्य मिश्रणासाठी करता येतो. तसेच पेंडीचे पीठ तयार करता येऊ शकते. पेंडीमध्ये ४० टक्के प्रथिने आहारदृष्ट्या इतर प्रथिनांच्या तोडीची आहेत. सूर्यफूल पेंडीत कोणतेही अपायकारक घटक नाहीत. म्हणून याचा वापर मुख्यत्वे गाय, शेळी, मेंढी इत्यादी रवंथ करणाऱ्या जनावरांच्या आहारात करतात.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en