Get Mystery Box with random crypto!

माॅन्सूनने जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला सौजन्य : अॅग्र | कृषिक अँप Krushik app

माॅन्सूनने जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 14-Jun-22
पुणे : महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) पुढील प्रवास वेगाने सुरू आहे. मॉन्सूनने सोमवारी (ता.१३) जवळपास निम्मा महाराष्ट्र व्यापला असून, नंदूरबार, जळगाव, परभणी पर्यंतच्या भागात मजल मारली आहे. बुधवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून विदर्भाच्या काही भागात दाखल होण्याची शक्यताही हवामान विभागाने (IMD)वर्तविली आहे.
गोव्याच्या उंबरठ्यापर्यंत पोचल्यानंतर महाराष्ट्रात दाखल होण्यासाठी तब्बल दहा दिवस वाट पहायला लावल्याने चिंतेचे वातावरण तयार झाले होते. १० जून रोजी कोकणात प्रवेश करणारा मॉन्सून ११ जून रोजी बहुतांशी कोकण, मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भागात डेरेदाखल झाला. तर आज (ता. १३) मॉन्सूनने संपूर्ण कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या बहुतांश भागापर्यंत टप्पा गाठला आहे. निम्म्या महाराष्ट्रासह, दक्षिण गुजरात, कर्नाटकचा बहुतांश भाग, तेलंगाणा, रायलसीमाचा काही भाग आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागातही मॉन्सूनने चाल केली केल्याचे हवामान विभागाने (IMD) स्पष्ट केले.
वाटचालीस पोषक हवामान असल्याने बुधवारपर्यंत (ता. १५) मॉन्सून संपूर्ण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू व्यापून, विदर्भ, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, बंगालच्या उपसागराच्या काही भागात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत (ता. १७) ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये देखील मॉन्सून पोहोचण्याचे संकेत आहेत.
विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी पावसाचा अंदाज : मॉन्सूनची वाटचाल, पूर्वमोसमी पाऊस यामुळे राज्याच्या तापमानात घट झाली आहे. मॉन्सून दाखल झालेल्या भागात जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. आज (ता. १४) विदर्भासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. तर कोकणात हलक्या पावसाची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे.
हरियाणापासून आसामपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. दक्षिण गुजरात किनाऱ्यापासून उत्तर केरळपर्यंत पश्चिम किनारपट्टीला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे. पूर्वमध्य अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यापासून उत्तर मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेशपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. अरबी समुद्रासह, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशात ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
निम्म्या महाराष्ट्रात मॉन्सून दाखल झाला आहे. पूर्वमोसमी पावसाच्या हजेरीने कमाल तापमानात घट होऊ लागली आहे. सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपुरी येथे राज्यातील उच्चांकी ३९.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्याच्या सर्वच भागात कमाल तापमान चाळीशीच्या खाली आले आहे.
सोमवारी (ता. १३) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३२.९, धुळे ३८.०, कोल्हापूर २९.६, महाबळेश्वर २२.३, नाशिक ३२.३, निफाड ३६.८, सांगली ३२.६, सातारा ३१.२, सोलापूर ३६.२, सांताक्रूझ ३२.९, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३१.१, औरंगाबाद ३४.४, परभणी ३२.२, अकोला ३५.०, अमरावती ३६.०, बुलडाणा ३७.४, ब्रह्मपुरी ३९.४, चंद्रपूर ३८.०, गोंदिया ३६.६, नागपूर ३६.९, वर्धा ३८.०, यवतमाळ ३६.०
राज्याच्या विविध भागात पडलेला पाऊस (मि.मी) (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : मालवण ७०, दोडामार्ग ४०, अलिबाग, सावंतवाडी प्रत्येकी २०
मध्य महाराष्ट्र : धुळे, शहादा प्रत्येकी ४०, दौंड, नांदगाव, सुरगाणा प्रत्येकी ३०, मालेगाव, सावळीविहीर, सिंधखेडा प्रत्येकी २०
मराठवाडा : अंबड ३०, खुलताबाद, बदनापूर, कन्नड, भोकरदन प्रत्येकी २०
विदर्भ : देऊळगाव राजा, सिरोंचा प्रत्येकी ३०, लोणार, बुलडाणा प्रत्येकी २०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en