Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला टोमॅटो महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
टोमॅटो
महाराष्ट्रात साधारणतः तीनही हंगामांत टोमॅटोची लागवड यशस्वीरीत्या केली जाते. खरीप हंगामात टोमॅटो लागवडीसाठी मे-जून महिन्यात रोपवाटिकेमध्ये बी पेरून जून-जुलै महिन्यात रोपांची पुनर्लागवड करावी. अपेक्षित उत्पादनासाठी योग्य रोपांची निवड, त्यांची योग्य पुनर्लागवड यासोबतच रोप व्यवस्थापन चांगल्याप्रकारे आवश्‍यक असते. एक एकर क्षेत्रासाठी १.२ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी. टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी ५० ग्रॅम बियाणे एक एकर क्षेत्रासाठी पुरेसे असते. रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी व कुळवून घ्यावी. ३ मी x १ मी x १५ सेंमी आकाराचे गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, ८० ग्रॅम १९:१९:१९ किंवा १०० ग्रॅम १५:१५:१५ चांगले एकसारखे मिसळावे. बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्‍टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे. त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोग नियंत्रणात राहतात. त्यानंतर हाताने १० सेंमी अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये १ सेंमी अंतरावर एक-एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत. साधारणपणे ५-८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे. जमिनीच्या मगदुरानुसार पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, या���ुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५-३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादीवाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेंडाझीम २-३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
*कांदा-लसूण*
खरीप कांदा रोपवाटिका
एक एकर कांदा लागवडीसाठी २ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका तयार करावी. एक एकर लागवडीसाठी २-३ किलो बी पुरेसे होते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास २ ग्रॅम कार्बेन्डाझिम हे बुरशीनाशक चोळावे. पेरणीपूर्वी २०० किलो शेणखतासोबत ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरून जमिनीत मिसळावे. रोपवाटिकेत ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धती वापरण्यासाठी जमिनीपासून १०-१५ सें.मी. उंच, १-१.२ मीटर रुंद आणि गरजेनुसार लांब गादीवाफे जमिनीच्या उताराला आडवे तयार करावेत. त्यामुळे रोपांची वाढ एकसारखी होते. पाणी फार काळ साचून राहत नाही, त्यामुळे रोपे कुजत किंवा सडत नाहीत. तसेच लावणीच्या वेळी रोपे सहज उपटून काढता येतात. रोपांच्या गाठी जाड व लवकर तयार होतात. वाफे तयार करताना १६०० ग्रॅम नत्र, ४०० ग्रॅम स्फुरद, ४०० ग्रॅम पालाश प्रति २०० वर्ग मीटर याप्रमाणात खते द्यावीत. रुंदीशी समांतर ५-७.५ सें.मी. अंतरावर रेघा पाडून १-१.५ सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. पेरणीनंतर चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खताने बियाणे झाकावे. नंतर झारीने जेमतेम वाफ्यावर फिरेल अशा पद्धतीने पाणी द्यावे. अति उष्णतेमुळे बियांची उगवण व रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होऊ नये, यासाठी वाफ्यावर दुपारच्या वेळी सावली राहील अशी सोय करावी. तण नियंत्रणासाठी रोपे उगवण्यापूर्वी वाफ्यावर पेंडीमिथॅलीन २ मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पेरणीनंतर २० दिवसांनी हाताने खुरपणी करून, ८०० ग्रॅम प्रति २०० वर्ग मीटर या प्रमाणात नत्र द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en