Get Mystery Box with random crypto!

सोयाबीन दराची मुसंडी रशिया, युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय ब | कृषिक अँप Krushik app

सोयाबीन दराची मुसंडी रशिया, युक्रेन युध्दामुळे आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 25-Feb-22

पुणेः रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु होताच जागतिक सोयाबीन बाजारात मोठी तेजी आली. सोयाबीन दराने दशकातील विक्रम गाठला. यासोबतच देशातील बाजारांतही सोयाबीन दराने उसळी घेतली. देशात सोयाबीनला ६ हजार ते ७ हजार ७५० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. युध्दाच्या परिस्थितीमुळे बाजारात आणखी चढ-उतार होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.
रशिया, युक्रेनसह काळा समुद्रीय देशांत जागातीक एकूण सूर्यफूल उत्पादनापैकी तब्बल ६० टक्के उत्पादन होते. तर याच देशांतून जागाच्या ७६ टक्के निर्यात होते. रशिया आणि युक्रेनमध्ये युध्द सुरु झाल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सूर्यफूल तेल उपलब्धतेत अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयातेल आणि पामतेलाच्या दरात मोठी तेजी आली. एकूणच तेलबाजाराला दराची फोडणी मिळाली. पामतेलही विक्रमी पातळीवर पोचले आहे. बुर्सा मलेशियावर कच्च्या पामतेलाचे मार्चचे वायदे विक्रमी ७ हजार ४४ रिंगीट प्रतिटनांवर पोचले आहेत. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे. तर चीनच्या बाजारात सोयापेंडच्या दरात जबरदस्त तेजी आली. त्यामुळे चीनी सरकाराने बाजारावरील युध्दाचे सावट दूर करण्यासाठी साठ्यातील सोयाबीन बाजारात आणण्याचा निर्णय घेतला.
आधीच ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन पिकाला दुष्काळ आणि पासाचा फटका बसत आहे. त्यामुळे दरात मोठी सुधारणा पाहायला मिळाली. आता युध्दाच्या परिस्थितीमुळे दरात मोठी तेजी आली. सीबाॅटवर सोयाबीन दराने विक्रमी १७५० सेंट प्रतिबुशेल्सचा टप्पा गाठला होता. सोयाबीन दरात आणखी तेजी येण्याची शक्यता असल्याचं जाणकारांनी सांगितले.
देशातील बाजारही तेजीत : देशातील सोयाबीन दरही विक्रमी पातळीवर पोचले आहेत. देशभरात सोयाबीन दर ६ हजार ते ७ हजार ७५० रुपयांवर पोचले होते. तर प्लांट्सचे दरही ७ हजार ७०० ते ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान राहिले. सोयाबीन दरात तेजी आल्यानंतर आवकही वाढली आहे. लातूर बाजार समितीत गुरुवारी १२ हजार क्विंटलची आवक झाली होती. तर कमाल दर साडेसात हजारांवर पोचला होता. तर सर्वसाधारण दर ७ हजार ३५० रुपयांवर होता. मध्य प्रदेशातही सोयाबीन दराने साडेसात हजारांचा टप्पा पार केला. इंदोर बाजारात ६ हजार ५०० ते ७ हजार ६०० रुपयांपर्यंत दर मिळाले. तर देवास येथे सर्वसाधारण दर ७ हजार ४०० रुयांवर होता. उज्जैन येथेही सर्वसाधारण दर ७ हजार ४०० रुपयांवर होता.
युक्रेन आणि रशियातील युध्दामुळे सूर्यफूल तेलाचे उत्पादन आणि पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोयातेल आणि पामतेलाला अचानक मागणी वाढून दर वाढले. परिणामी देशातील सोयाबीन बाजाराने उसळी घेतली. युध्दाची परिस्थिती केव्हा निवळेल यावर बाजाराचे भविष्य अवलंबून आहे. - अजय केडिया, संचालक, केडिया अॅडव्हायजरी
सोयातेलाला मागणी वाढण्याचा अंदाज आहे. तसेच ब्राझीलसह इतर देशांत सोयाबीन उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सोयाबीन दरात मोठी सुधारणा पाहायला मिळत आहे. दर सुधारल्याने सोयाबीनची आवकही वाढली आहे. - अशोक अगरवाल, सोयाबीन व्यापारी, लातूर
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true