Get Mystery Box with random crypto!

२२ जुलै इ.स.१६७८ दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराज | " छञपती श्री शिवाजी महाराज "

२२ जुलै इ.स.१६७८
दक्षिण दिग्विजय मोहिमेत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला ताब्यात घेतला व त्याची व्यवस्था लावून महाराजांनी त्याच भागातील आणखी एक बळकट दुर्ग वेल्लोरला वेढा दिला. वेल्लोरचा भुईकोट किल्ला विजयनगर साम्राज्याचा या भागातील सरदार चिन्नबोमी नायक याने बांधला होता. किल्ल्याला दुहेरी तटबंदी व जवळपास ७५ फूट रुंदीच्या खंदकाचे सरंक्षण होते. बलदंड वेल्लोर लवकर जिंकणे सहजासहजी शक्य नाही हे ओळखून महाराजांनी वेढ्याचे काम नरहरी रुद्र यांच्याकडे सोपवले व ते शेरखान पठाणाचा बंदोबस्त करण्यासाठी गेले. पुढे दक्षिण मोहीम आटोपून महाराज रायगडावर परतले तरीही वेल्लोरचा वेढा चिवट मराठ्यांनी रघुनाथपंत व सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली जवळपास वर्षभर सुरूच ठेवला होता. शेवटी किल्ल्यात पसरलेल्या रोगराईला कंटाळून व विजापुरावरून मदत मिळण्याची शक्यता नसल्याने किल्लेदार अब्दुलाखान याने ५० हजार होन घेऊन वेल्लोर किल्ला रघुनाथपंतांच्या हवाली केला. वेल्लोर किल्ला स्वराज्यात आला.



२२ जुलै इ.स.१६८३
(श्रावण शुद्ध ९, नवमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार रविवार)

छत्रपती संभाजी महाराजांचा चौलवर हल्ला!
पोर्तुगीज विसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांचे वकिल येसाजी गंभीर यांना नजर कैदेत टाकल्याने छत्रपती संभाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यातील युद्ध चांगलेच भडकले. २ हजार घोडदळ व ६ हजार पायदळ, बरोबर घेऊन छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेल्या चौलच्या ठाण्यास वेढा घातला. छत्रपती संभाजी महाराज वेढा घालून स्वस्थ बसले नाहीत. चौलच्या तटबंदी वर मराठी सैन्याकडून अविरत होणारे तोफांचे हल्ले, आक्रमणे याचा प्रतिकार करता करता चौल तटबंदीच्या आतील पोर्तुगीज शिबंदी मेटाकुटीस आली. तेव्हा अक्षरशः शहरातील भिक्षू व नागरिक लढावयास आले. राठ्यांच्या प्रबळ हल्ल्यापुढे रडकुंडीस आलेल्या पोर्तुगिजांनी ""मेरी वर्जिन आणि सेंट स्टिफन यांची करुणा भाकण्यास सुरुवात केली. इतका प्रखर हल्ला करून छत्रपती संभाजी महाराजांनी पोर्तुगिजांचा नक्शा उतरविला.



२२ जुलै इ.स.१७४२
दि.२२ जुलै इ.स.१७४२ श्रावण शु. द्वितीया शके १६६४ दुन्दूभिनाम संवत्सरी, गुरुवारी गोपिकाबाईंच्या पोटी पुत्र जन्माला आले.नानासाहेब पेशवे यांचे पहिलेच पुत्र. शनिवारवाडा आनंदाच्या चांदण्यात न्हाऊन निघत होता.सर्वात जास्त आनंद झाला होता तो म्हणजे राधाबाईंना..! राधाबाईंनी त्यांच्या पणतू चे बारशाच्या वेळेस "विश्वास" असे ठेवले. राधाबाईंच्या मुलाची व नानासाहेबांच्या वडिलांची, बाजीरावांची आठवण म्हणून मुलाचे नाव विश्वासराव (विश्वनाथ) ठेवण्यात आले.



२२ जुलै इ.स.१७८५
पेशव्यांच्या आरमाराचे प्रमुख जानोजी धुळप यानी पोर्तुगीजांचे ‘सांतान' नावाचे 'फ्रिगेट' पकडून विजयदुर्गला नेल्याचा उल्लेख आढळतो. हे फ्रिगेट सुस्थितीत पोर्तुगीजांच्या हातास लागले नाही. धुळपानी त्याच्या तोफा आणि इतर उपयुक्त सामान काढून घेऊन फक्त त्याचा सांगाडा तेवढा पोर्तुगीजांच्या हवाली केला. परंतु सांगाडा मिळाल्याने पोर्तुगीजांचे समाधान झाले नाही. त्यानी पुणे दरबाराकडे त्याची नुकसान भरपायी मागितली. पुणे दरबाराने ६६४५४ रुपये, ३००० रुपयांचे लाकूड व बारा हजार रुपये उत्पन्नाची गावे नुकसान भरपायीदाखल देऊ केली. दि. ११ जानेवारी १७८० या दिवशी पुणे दरबार आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये सांतान युद्धनौकेच्या नुकसान भरपायीबाबत करार झाला. तदनुसार पोर्तुगीजाना नगरहवेलीत बारा हजार रुपये उत्पन्नाची ७२ गावे मिळाली. त्यांचा ताबा पोर्तुगीजानी अनुक्रमे दि. १० जून १७८३ व दि. २२ जुलै १७८५ रोजी घेतला. स. १७८५ साली पोर्तुगीज आणि पुणे दरबार यांच्यामध्ये जो करार झाला त्यात नगरहवेलीतील हिंदूना धर्मस्वातंत्र्य असावे, गोहत्त्येस बंदी, हिंदूंच्या परंपरागत चालीरितींचे व देवालयांचे संरक्षण वगैरे अटींचा समावेश होता.



२२ जुलै इ.स.१८४४
१८४४ चा गडकरी उठाव
उठावाची पहीली ठिणगी ही २२ जुलै १८४४ रोजी किल्ले भुदरगड येथे पडली. भुदरगडच्या गडकऱ्यांनी मामलेदाराला गडावर घेण्याचे नाकारले. त्यातून बंडास सुरूवात झाली. पाठोपाठ गडहिंग्लज जवळील सामानगडारील गडकऱ्यांनी बंडाचे निशाण उभारले. गडाचे दरवाजे बंद करून त्यांनी सरकारी अधिकारी लोकांना गडावर येण्यास मज्जाव केला. या बंडाचे नेतृत्व रामजी जाधव, दौलतराव घोरपडे, बापुजी बाजीराव सुभेदार, गोविंद फडणीस, गणेश मुजुमदार, यशवंत फडणीस, मुंजाप्पा कदम, जोतिबा आयरे या लोकांनी केले. या बंडाची बातमी समजताच कोल्हापुराहुन रताजीराव हिम्मतबहाद्दर चव्हाण व हणमंतराव सरलष्कर हे सामान गडावर चालुन गेले. गडकर्यांनी या दोघांचा पराभव केला. यामुळे गडकरी लोकांचा उत्साह वाढला. सभोवतालच्या परिसरातील लोकांनी गडकरी लोकांस मिळण्यास सुरूवात केली.