Get Mystery Box with random crypto!

पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता सौजन्य : अ | कृषिक अँप Krushik app

पूर्व विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 19-Aug-22
पुणे : विदर्भ, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. आज (ता. १९) पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडिपीसह, श्रावण सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा पाकिस्तानातील कमी कमी दाब क्षेत्रापासून बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. या आसाचा पश्चिमेकडील भाग उत्तरेकडे सरकणार आहे. पूर्वेकडील भाग सर्वसाधारण स्थितीत कायम राहील. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे. रायलसीमा, तमिळनाडू ते कोमोरीन भागापर्यंत दक्षिणोत्तर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.
राज्यात पावसाने उघडीप दिली असतानाच, तुरळक ठिकाणी ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी पडत आहेत. आज (ता. १९) पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मुख्यतः उघडिपीसह हलक्या सरींचा अंदाज आहे.
बंगालच्या उपसागरात एकामागून एक कमी दाब क्षेत्र तयार होत आहेत. बांगलादेश आणि म्यानमार किनाऱ्यालगतच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. त्याला लागूनच ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. प्रणालीची तीव्रता वाढत आहे. आज (ता. १९) उत्तर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाब क्षेत्राची (डिप्रेशन) निर्मिती होणार आहे. ही प्रणाली पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा, झारखंड उत्तर छत्तीसगड कडे येण्याचे संकेत आहेत. आग्नेय पाकिस्तान आणि परिसरावरही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) : परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
गुरूवारी (ता. १८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस, मिलीमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) : कोकण : दापोली, अंबरनाथ, माथेरान प्रत्येकी ५०, जव्हार, वाकवली प्रत्येकी ४०, तळा, मंडणगड, उल्हासनगर, खेड, पालघर, कल्याण, वेंगुर्ला, पोलादपूर, शहापूर, तलासरी, म्हसळा, हर्णे, कणकवली प्रत्येकी ३०
मध्य महाराष्ट्र : महाबळेश्वर, इगतपुरी प्रत्येकी ७०, लोणावळा, वेल्हे प्रत्येकी ४०, पेठ, सुरगाणा, जावळीमेढा, गगनबावडा, त्र्यंबकेश्वर प्रत्येकी ३०
घाटमाथा : दावडी, ताम्हिणी ८०, शिरगाव, अंबोणे, डुंगुरवाडी प्रत्येकी ७०, कोयना नवजा प्रत्येकी ६०, भिरा ५०
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en