Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला आले जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आडवी-उभी नांगरट | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
आले
जमीन भुसभुशीत राहण्यासाठी आडवी-उभी नांगरट करून घ्यावी. दोन नांगरटींमध्ये पंधरा दिवसांचे अंतर ठेवावे. त्यानंतर मागील पिकाची धसकटे वेचून कच्चे गादीवाफे तयार करून घ्यावेत. कच्या गादीवाफ्यावर शेणखत एकरी १२ ते १५ टन, निंबोळी पेंड ४०० किलो, सिंगल सुपर फॉस्फेट २०० किलो, म्युरेट ऑफ पोटॅश ५० किलो टाकून घ्यावा. त्यानंतर रोटाव्हेटर मारून खते मिसळून घ्यावीत. पक्के गादीवाफे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावल्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५० ते ६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेऊन, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा त्यापेक्षा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळीप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि रोपांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. आले लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आल्याची लागवड करावी आणि लगेच पाणी द्यावे. लागवड करताना कंदावरील डोळा वरती आणि बाहेरच्या बाजूला असावा, त्यामुळे निपजणारा कोंब मजबूत असतो आणि त्याची वाढ चांगली होते. कंद ४ ते ५ सें.मी. खोल लावावेत. लागवडीच्या वेळी कंद पूर्णपणे झाकले जातील, याची दक्षता घ्यावी. एकरी ३० ते ३५,००० रोपांची संख्या किंवा कंदांची संख्या ठेवावी.
*हळद*
प्रवाही पाणी देण्यासाठी सरी-वरंबा पद्धत, तर यांत्रिकीकरण आणि ठिबक किंवा तुषार सिंचन पद्धतीसाठी गादीवाफ्यावर लागवड करावी.
सरी-वरंबा पद्धत: ७५-९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. सऱ्या पाडण्यापूर्वी एकरी १२ टन कुजलेले शेणखत, ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ७५ किलो पोटॅश जमिनीत मिसळून द्यावे. जमिनीच्या उतारानुसार ६-७ सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५-६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस ३० सें.मी. अंतरावर गड्डे कुदळीने आगाऱ्या घेऊन लावावे किंवा वाकुरी पाण्याने भरल्यानंतर गड्डे पाण्यामध्ये वरंब्यात ३ व ५ सें.मी. खोल दाबून घ्यावेत.
गादीवाफा पद्धत: या पद्धतीत ४-५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. गादीवाफ्याच्या मध्यभागी लॅटरल अंथरून लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे/ आडवे लावावेत. म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लागतात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीवेळी कंदाची निमुळती बाजू खाली जाणार नाही, याची काळजी घ्यावी. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en