Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला संत्रा-मोसंबी-लिंबू नवीन बागेचे व्यवस्थापन | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
संत्रा-मोसंबी-लिंबू
नवीन बागेचे व्यवस्थापन
नवीन संत्रा, मोसंबी बाग लागवडीच्या जमिनीची खोली कमीत कमी एक मीटर असावी. मात्र एक मीटरपेक्षा कमी खोली असलेल्या जमिनीमध्ये संत्रा, मोसंबी लागवड केल्यास योग्यप्रकारे खते व मशागतीचा अवलंब करावा लागतो. निवडलेली जमीन ही पाण्याचा योग्य निचरा होणारी, ६० टक्क्यांपेक्षा कमी चिकण माती असणारी, ८.३ पेक्षा कमी सामू असणारी, १२ टक्क्यांपेक्षा कमी मुक्त चुनखडीचे प्रमाण असणारी आणि स्थिर पाण्याची पातळी दोन मीटरपेक्षा अधिक असलेल्या जमिनीची निवड करावी.
मे महिन्यात खोदून ठेवलेले खड्डे भरून घ्यावेत. खड्डे भरतांना त्यांत दोन भाग पृष्ठभागावरील गाळाची माती, एक भाग वाळू आणि एक भाग कुजलेले शेणखत अधिक १ किलो सिंगल सुपर फॉस्फेट, १ किलो निंबोळी पेंड व १०० ग्रॅम क्लोरपायरिफॉस भुकटी एकत्र मिसळून खड्डे भरावे.
*आंबा*
कोय कलम
आंब्याच्या अभिवृद्धीसाठी ही साधी व सोपी पद्धत वापरून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे करता येतात. या पद्धतीत सुमारे ७०-८०% यश मिळते. यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य आहे. या पद्धतीत गादीवाफ्यावर कोयी रुजवून १५-२० दिवसांचे, पाने व देठाचा रंग तांबडा असलेले रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. रोपाचा खालचा ७-९ सें.मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून मधोमध सुमारे ४-६ सें.मी. लांबीचा उभा काप घ्यावा. तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि फुगीर डोळ्याची , १०-१५ सें.मी लांबीची काडी घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत. काडीच्या खालून ४-६ सें.मी. लांबीचा पाचरीसारखा काप घेऊन आकार द्यावा. ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. जाड काडीसाठी एक बाजू रोपाच्या सालीस जुळवून घ्यावी. कलमाचा जोड २ सें.मी. रुंद व २० सें.मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. बांधलेली कलमे १४ x २० सें.मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड २-५ सें.मी. मातीच्यावर राहील याची काळजी घ्यावी. कलमांना गरजेनुसार पाणी द्यावे, मात्र पाणी कलमांच्या जोडात जाणार नाही याची काळजी घ्यावी. कलमाच्या फुटीवरील पाने गर्द हिरवी झाल्यावर कलमे हळूहळू मोकळ्या जागी उघड्यावर आणावीत. कलमाच्या जोमदार वाढीसाठी आठ दिवसांपर्यंत साठविलेल्या ५०% गोमुत्राची फवारणी (२० मि.लि.) व ५०% गोमुत्राची (१०० मि.लि.) प्रति पिशवीत भिजवण महिन्यातून एकदा अशी तीन महिने करावी.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en