Get Mystery Box with random crypto!

मॉन्सूनचा यंदा १०३ टक्के पाऊस; हवामान विभागाचा सुधारित अंदाज ज | कृषिक अँप Krushik app

मॉन्सूनचा यंदा १०३ टक्के पाऊस; हवामान विभागाचा सुधारित अंदाज जाहीर

सौजन्य : अॅग्राेवन
दिनांक : 01-Jun-22
पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात (जून ते सप्टेंबर) यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) (आयएमडी) मंगळवारी (ता. ३१) जाहीर केला. या अंदाजात चार टक्क्यांची कमी-अधिक तफावत गृहीत धरण्यात आली आहे. पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून असलेल्या भागात यंदा सरासरीपेक्षा अधिक (१०६ टक्के) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामान शास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मॉन्सून पावसाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागाने १४ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात ९९ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. १९७१ ते २०२० कालावधीत देशाची मॉन्सून पावसाची सरासरी ८७ सेंटिमीटर म्हणजेच ८६८.६ मिलिमीटर आहे. तर सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस सर्वसाधारण मानला जातो.
‘स्टॅटेस्टिकल फोरकास्टिंग सिस्टिम आणि मल्टी मॉडेल एनसेंबल फोरकास्टिंग सिस्टिम या मॉडेलचा वापर करून मॉन्सून हंगामातील पावसाचा अंदाज वर्तविला आहे. सुधारित अंदाजानुसार मॉन्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक (३६ टक्के), तर दुष्काळाची शक्यता ५ टक्के असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
यंदा मॉन्सून हंगामात देशात पावसाचे वितरण चांगले राहण्याची शक्यता आहे. यात देशाच्या बहुतांशी भागात सरासरी ते सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. देशाची पूर्व-मध्य, पूर्व, ईशान्य, दक्षिण द्वीपकल्पाच्या नैॡत्य भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
हवामान विभागनिहाय पावसाचा अंदाज :
विभाग---अंदाज
वायव्य भारत---९२ ते १०८ टक्के
मध्य भारत---१०६ टक्के
दक्षिण भारत---१०६ टक्के
ईशान्य भारत---९६ ते १०६ टक्के
एल निनो स्थिती सर्वसामान्य : विषुववृत्तीय प्रशांत महासागरातील समुद्र पृष्ठभागात सध्या मध्यम ला निना स्थिती आहे. मॉन्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेल्सनुसार मॉन्सून हंगामात ही स्थिती कायम राहणार आहे. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक (आयओडी - इंडियन ओशन डायपोल) सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मॉन्सून हंगामातही ही स्थिती नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
जून महिन्यात पाऊस सरासरी ग���ठणार : यंदाच्या जून महिन्यात देशात ९२ ते १०८ टक्के सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता आहे. वायव्य, मध्य भारतासह, दक्षिण भारताच्या उत्तर भाग, पूर्व भारतातील राज्यात जून महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातील राज्ये आणि दक्षिण द्वीपकल्पाच्या दक्षिणेकडील भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जून महिन्यात मॉन्सूनच्या आगमनाचा कालावधी असल्याने हवामानात वेगाने बदल होत असतात. त्याचा पावसाच्या वितरणावर परिणाम होतो.
महाराष्ट्रात दमदार पावसाचे संकेत : मध्य भारतात १०६ टक्के पावसाचा अंदाज असल्याने महाराष्ट्रातही चांगला पाऊस पडणार आहे. संपूर्ण मॉन्सून हंगामाचा विचार करता यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे. यात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पश्‍चिम विदर्भात पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने प्रसिद्ध केलेल्या नकाशावरून स्पष्ट होत आहे. जून महिन्यातही राज्याच्या अनेक भागांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en