Get Mystery Box with random crypto!

मॉन्सून केरळात दाखल सौजन्य : अग्रोवन दिनांक : 30-May-22 पुण | कृषिक अँप Krushik app

मॉन्सून केरळात दाखल

सौजन्य : अग्रोवन
दिनांक : 30-May-22
पुणे : संपूर्ण देशासाठी वरदान ठरलेल्या नैऋत्य मोसमी वाऱ्यांचे (मॉन्सून) यंदा तीन दिवस आधीच देवभूमी केरळमध्ये आगमन झाले आहे. रविवारी (ता. २९) केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूच्या दक्षिण भागात मॉन्सून दाखल झाल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.
दीर्घकालीन आगमनाच्या वेळा लक्षात घेता साधारणत: मॉन्सून १ जूनपर्यंत केरळमध्ये पोहोचतो. यंदा मॉन्सून २७ मेपर्यंत केरळमध्ये येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती. यात चार दिवसांची तफावत गृहीत धरण्यात आली होती. त्यानुसार तीन दिवस आधीच मॉन��सून दाखल झाला असून, गतवर्षी मॉन्सूनचे आगमन दोन दिवस उशिराने (३ जून) झाले होते.
समुद्रसपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत पश्‍चिमेकडून वाहणारे वारे, अग्नेय अरबी समुद्रात वाढलेले पश्‍चिमी वाऱ्यांचे प्रवाह, अरबी समुद्र आणि केरळमधील ढगांचे अच्छादन, समुद्र आणि भूभागावरून परावर्तित होणारा किरणोत्सर्ग, गेल्या २४ तासांमध्ये १४ पैकी १० केंद्रांवर २.५ मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाल्याने केरळात मॉन्सून दाखल झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
रविवारी (ता. २९) दक्षिण अरबी समुद्राचा उर्वरित भाग, लक्षद्वीप बेटे, केरळचा बहुतांशी भाग, तमिळनाडूचा दक्षिण भाग, मन्नारचे आखात आणि नैऋत्य बंगालच्या उपसागाच्या आणखी काही भागात मॉन्सूनचे प्रगती केली आहे. कर्नुल, पलक्कडपर्यंतच्या भागात मॉन्सून दाखल झाला आहे. येत्या तीन ते चार दिवसांत संपूर्ण केरळ व्यापून, मध्य अरबी समुद्र, कर्नाटकच्या काही भागांसह, तमिळनाडूनचा आणखी काही भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागासह ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा ९९ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) १४ एप्रिल रोजी जाहीर केला. या अंदाजात पाच टक्के कमी-अधिक पाऊस पडण्याची शक्‍यताही गृहीत धरण्यात आली आहे. मॉन्सून हंगामात ला-निना स्थिती राहण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तविली आहे. लवकरच हवामान विभागाकडून मॉन्सून हंगामाचा सुधारित दीर्घकालीन अंदाज व विभागनिहाय पावसाचे वितरण स्पष्ट करण्यात येईल.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en