Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला *हळद* लागवड पद्धती सरी-वरंबा पद्धत: सरी | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
*हळद*
लागवड पद्धती
सरी-वरंबा पद्धत: सरी-वरंबा पद्धतीने लागवडीसाठी ७५ ते ९० सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून घ्याव्यात. जमिनीच्या उतारानुसार सहा ते सात सरी-वरंब्याचे एक वाकुरे याप्रमाणे वाकुरी बांधून घ्यावीत. वाकुऱ्याची लांबी ५ ते ६ मीटर ठेवावी. वरंब्याच्या दोन्ही बाजूंना ३० सें.मी. अंतरावर कंदांची लागवड करावी. कंदावर ३ ते ४ इंच माती येईल अशा पद्धतीने कंद लावावेत. एकरी २८-२९,००० कंद लागतात.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत: ही पद्धत यांत्रिकीकरण व ठिबक किंवा तुषार सिंचनासाठी उपयुक्त ठरते. या पद्धतीद्वारे विद्राव्य खतेही देता येतात, उत्पादनात वाढ मिळते. या पद्धतीत ४ ते ५ फूट अंतर ठेवून सऱ्या पाडाव्यात. वरंबे सपाट करून १ फूट उंचीचे आणि ६० सें.मी. सपाट माथा असलेले गादीवाफे बनवावेत. जास्त पावसाच्या प्रदेशात गादीवाफ्याची उंची १.५ फूट ठेवावी. गादीवाफ्याच्या बरोबर मध्यभागी लॅटरल अंथरून घ्यावी. लॅटरलच्या दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतरावर कंद उभे किंवा आडवे लावावेत, म्हणजे दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. राहते. दोन कंदामधील अंतरही ३० सें.मी. ठेवावे. एकरी साधारणतः २२-२३,००० कंद लावले जातात. तुषार सिंचन पद्धतीचा वापर करण्यासाठी दोन सऱ्यांमधील अंतर ६ फूट ठेवावे. गादीवाफ्याची उंची १ फूट व रुंदी ४ फूट ठेवावी. दोन्ही बाजूंना १५ सें.मी. अंतर ठेवून दोन ओळींमधील अंतर ३० सें.मी. ठेवावे. एका गादीवाफ्यावर कंदांच्या चार ओळी लावाव्यात. दोन कंदांमध्ये ३० सें.मी. अंतर ठेवावे. गादीवाफे पूर्ण भिजवूनच लागवड करावी.
*आले*
लागवड पद्धती
सपाट वाफे पद्धत: पठारावरील सपाट जमिनीवर जेथे पोयटा किंवा वाळूमिश्रीत माती आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. जमिनीच्या उतारानुसार २ x १ मीटर किंवा २ x ३ मीटरचे सपाट वाफे करावेत. सपाट वाफ्यामध्ये लागवड २० x २० सें.मी. किंवा २२.५ x २२.५ सें.मी. अंतरावर करावी.
सरी-वरंबा पद्धत: मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी-वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. अंतरावर सऱ्या पाडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूस वरून १/३ भाग सोडून दोन इंच खोल लागवड करावी. दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे.
रुंद वरंबा/ गादीवाफा पद्धत: काळी जमीन, त���ेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा जेथे वापर केला जातो अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करावी. या पद्धतीने १५-२० टक्के अधिक उत्पादन मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादीवाफ्याची लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमधील अंतर ४ ते ५ फूट ठेवावे. गादीवाफ्यावर दोन ओळी लावायच्या असतील, तर ठिबक सिंचनाचा वापर करावा. गादीवाफ्याची वरची रुंदी ५०-६० सें.मी., तर उंची ३० सें.मी. ठेवावी. दोन ओळींतील अंतर ३० सें.मी. ठेवून, दोन कंदांमधील अंतर २२.५ सें.मी. ठेवावे. गादीवाफ्यावर तीन किंवा जास्त ओळी लावायच्या असतील तर तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. त्यासाठी ओळींप्रमाणे दोन सरींतील अंतर ठेवून गादीवाफ्यावरील दोन ओळींमध्ये आणि कंदांमध्ये २२.५ सें.मी. अंतर ठेवावे. लागवडीपूर्वी गादीवाफे पूर्णपणे भिजवून घेऊन वाफसा आल्यानंतर आले लावावे आणि लगेच पाणी द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en