Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला आले जमिनीची निवड आले हे कंदवर्गीय पीक असल्या | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
आले
जमिनीची निवड
आले हे कंदवर्गीय पीक असल्याने जमीन भुसभुसीत असणे गरजेचे आहे. त्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम प्रतीची, कसदार जमीन निवडावी. नदीकाठची गाळाची जमीन कंद वाढीच्या दृष्टीने योग्य असते. कोकणातील जांभ्या जमिनीत, तसेच तांबड्या पोयट्याच्या जमिनीतही आल्याचे चांगले उत्पादन मिळते. या पिकाचे कंद जमिनीमध्ये एक फूट खोलीपर्यंत वाढतात, त्यामुळे कमीत कमी एक फूट खोली असलेली जमीन निवडावी. हलक्‍या जमिनीत भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे गरजेचे आहे. जमिनीचा सामू ६.५ ते ७ या दरम्यान असावा. लागवडीसाठी आम्लधर्मी, क्षारयुक्त, चोपण जमिनी शक्‍यतो टाळाव्यात. चुनखडीयुक्त जमिनीत पीक येते. परंतु त्यावर पिवळसर छटा कायम दिसते. उत्पादनात घट येते. आल्याच्या लागवडीसाठी जमीन निवडत असताना कंदवर्गीय पिके घेतलेली जमीन (उदा. हळद, बटाटा, रताळे इ.) निवडू नये, त्यामुळे कंदकूजचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असतो. शक्यतो द्विदलवर्गीय पिकांचा बेवड या पिकासाठी उत्तम समजला जातो.
हळद
जमिनीची निवड
हळद पिकाची यशस्विता प्रामुख्याने जमिनीच्या निवडीवर अवलंबून असते. हे पीक कोकणामध्ये अगदी जांभ्या जमिनीमध्ये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीमध्ये घेतले जाते. जमीन ही उत्तम निचरा असणारी निवडावी. कारण हे पीक जमिनीमध्ये आठ ते नऊ महिने राहते. पाण्याचा उत्तम निचरा नसल्यास हळदीस कंदकूज होण्याचा धोका वाढतो. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान असावा. सेंद्रिय कर्बाचे प्रमाण ०.५ टक्क्यांपेक्षा जास्त असावे. जमिनीची खोली २५ ते ३० सें.मी. असावी. जमिनीचा पोत चांगला राखण्याच्या दृष्टीने द्विदल किंवा हिरवळीची पिके (ताग, धैंचा) गाडून जमिनीची पूर्वमशागत करावी. भारी, काळ्या चिकण आणि क्षारयुक्त जमिनीत हळदीचे पीक चांगले येत नाही, त्यामुळे अशा जमिनी शक्यतो हळद लागवडीसाठी टाळाव्यात. अगदी माळरानाच्या जमिनीत सुद्धा या पिकाची लागवड करता येते; परंतु या जमिनीमध्ये सरासरी उत्पादन मिळविण्याच्या दृष्टीने सुपीकता वाढवावी, सेंद्रिय खते व रासायनिक खतांचा एकात्मिक पद्धतीने वापर करावा. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा गरजेनुसार वापर करावा. चुनखडीयुक्त जमिनीमध्ये लागवड केल्यास पिकावर कायम पिळसर छटा राहते, कारण अन्नद्रव्यांचे ग्रहण या जमिनींमध्ये योग्यप्रकारे होत नाही. हळदीच्या पिकासाठी बेवड म्हणून कंदवर्गीय पिके जसे आले, बटाटा किंवा हळदीवर हळद घेणे शक्यतो टाळावे. हळदीसाठी द्विदल पिके जशी घेवडा, भुईमूग, हरभरा यांसारख्या पिकांचा बेवड चांगला असतो.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en