Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला भुईमुग पाणी व्यवस्थापन भुईमूग झाडाच्या तळाचा | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
भुईमुग
पाणी व्यवस्थापन
भुईमूग झाडाच्या तळाचा पृष्ठभाग सतत वाफसा स्थितीप्रमाणे ओलसर ठेवणे आवश्यक असते. यामुळे झाडाची वाढ सतत चांगली होते, फुलांचे प्रमाण वाढते. फुल कळीतून सुटलेल्या आऱ्या जमिनीमध्ये सुलभ व जलद घुसतात. शेंगांचे पोषण चांगले होऊन दर्जेदार उत्पन्न मिळते. उन्हाळी भुईमुगासाठी ७० ते ८० सें.मी. पाणी लागते. उन्हाळी हंगामात जमिनीच्या मगदुरानुसार ८ ते १० दिवसांच्या अंतराने १२ ते १४ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. फांद्या फुटण्याची अवस्था, आऱ्या सुटण्याची अवस्था, शेंगा पोसण्याच्या कालावधीत पाण्याचा ताण पडू देऊ नये.
भुईमुगाची लागवड रुंद वाफा सरी (इक्रीसॅट) पद्धतीने केली असता, पिकाला पाण्याचा ताण बसत नाही. अतिरिक्त पाण्याचा सरीतून निचरा करता येतो. तुषार सिंचन पद्धतीने पाणी देणे सोयीस्कर होते. या पद्धतीत पाटानेदेखील पाणी देता येते. वेगळी रानबांधणी करावी लागत नाही. तुषार सिंचन पद्धत व प्लॅस्टिक आच्छादन तंत्र भुईमुगासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तुषार सिंचनामुळे पाण्याची बचत होऊन पिकाभोवती सूक्ष्म वातावरण निर्मिती होते, ज्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. तसेच तुषार सिंचनाने समान पद्धतीने पाणी देता येते. प्लॅस्टिक आच्छादन तंत्र वापरल्यास ४० ते ५० टक्के पाण्याची बचत होते.
बाजरी
पाणी व्यवस्थापन
पेरणीनंतर ४ ते ५ दिवसांनी हलके (आंबवणीचे) पाणी द्यावे. त्यानंतर जमिनीच्या मगदुरानुसार व पिकाच्या वाढीच्या संवेदनक्षम अवस्थेत १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पाण्याची उपलब्धता मर्यादित असल्यास, पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी), दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी), तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीचे शेतकऱ्यांसाठी मोफत “कृषिक अॅप” खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा आणि हवामान अंदाज, कृषि व जोडधंदे सल्ला, बाजारभाव, तज्ञांचे लेख,कृषि गणकयंत्र, इतर कृषिविषयक उपयुक्त माहिती मिळवा.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&hl=en