Get Mystery Box with random crypto!

आजचा कृषी सल्ला पशु संवर्धन :- जनावरांना सुका चारा खाल्यावर, | कृषिक अँप Krushik app

आजचा कृषी सल्ला
पशु संवर्धन :-
जनावरांना सुका चारा खाल्यावर, दूध दिल्यावर आणि तहान लागेल तेव्हा पाण्याची गरज असते. सर्वसाधारणपणे पशुपालक दोन ते तीनवेळा जनावरांना पाणी पाजतात. त्यामुळे जनावराला तहान लागेल तेव्हा पाणी उपलब्ध होत नाही. तसेच अनेकवेळा जनावरे गरज नसताना सुद्धा सवय म्हणून मालकाने पाणी ठेवल्यावर अधिक पाणी पितात. या दोन्ही गोष्टींचा परिणाम चाऱ्याच्या पचनावर होतो, त्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर घट येते. यावर उपाय म्हणजे जनावराला तहान लागेल तेव्हा स्वच्छ व थंड पाणी पिण्यास उपलब्ध असावे. मुक्त संचार गोठा पद्धतीत जनावरे मुक्त असल्याने तहान लागल्यावर पाणी पिऊ शकतात, याचा फायदा एक ते दीड लिटर प्रति जनावर दूध उत्पादन वाढीवर झालेला पहावयास मिळतो. ज्यांच्याकडे मुक्त संचार गोठा नाही, ते पशुपालक बादलीला फ्लोट वॉल्व्ह बसवून कमी खर्चात, बांधलेल्या जनावरांनासुद्धा २४ तास पाणी उपलब्ध करून देऊ शकतात किंवा सकाळी व संध्याकाळी चारा खाऊन झाल्यावर गव्हाणी स्वच्छ करून त्यात पाणी भरून ठेवून सुद्धा जनावरांना तहान लागेल तेव्हा पाणी पिण्यास उपलब्ध करून देता येईल.
शेळी पालन :-
हिवाळ्यात लहान करडांच्या मरतुकीचे प्रमाण सर्वात जास्त असते. आपण त्यांची व्यवस्थित काळजी न घेतल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. म्हणून हिवाळ्यात करडांचा निवारा उबदार असावा. करडांचा निवारा हा नेहमी कोरडा, स्वछ आणि अमोनियामुक्त असावा; कारण हा वायू करडांच्या फुफ्फुसदाह निर्माण करून खोकला, श्‍वसनसंस्थेचे विकार व यातूनच जीवघेणा न्यूमोनियाचा आजार होऊ शकतो. करडांचा बिछाना कोरडा, मऊ, उबदार असावा. करडांचा बिछाना साधारणपणे २-३ दिवसांनी बदलावा. थंडी जास्त असेल त्यावेळी छोटी शेकोटी, विजेचा दिवा किंवा विजेची शेगडी वापरून गोठ्यातील हवा उबदार ठेवावी. यामुळे करडांचे सर्दी, हगवण आणि न्यूमोनिया यांपासून संरक्षण होईल. शेकोटी करताना जास्त धूर होणार नाही, याची काळजी घ्यावी. साधारणपणे गोठा एकदा उबदार झाल्यानंतर शेकोटी विझवावी. विजेचा दिवा साधारणपणे करंडापासून २० इंचांपेक्षा अधिक उंचीवर छताला टांगावा. विजेच्या दिव्याला संरक्षक पिंजरा असावा. करडांना हिवाळ्यात स्वछ आणि कोमट पाणी पिण्यासाठी द्यावे. एखाद्या करडाला खूप थंडी लागली असेल, तर त्याचे शरीर कोमट पाण्यात (४०-४५ अंश सेल्सिअस तापमान) ४-५ मिनिटे बुडवून ठेवावे, पण डोके पाण्याच्या वर ठेवावे. नंतर त्याचे शरीर व्यवस्थित चोळून त्याला स्वच्छ, कोरड्या कपड्यात किंवा गोणपाटात लपेटावे. कोरड्या जागी ठेवावे आणि जमल्यास कोमट दूध पाजावे. नवजात करडाला त्याच्या वजनाच्या १/१० इतका चिक पाजावा, त्यामुळे करडात नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती येते. पोट साफ होण्यास मदत होते. चीक पाजल्यामुळे मरतुकीचे प्रमाण २-३ टक्के कमी करता येते.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true