Get Mystery Box with random crypto!

आजचा फळ पीक सल्ला ( केळी, आंबा) केळी कमी तापमानामुळे केळी पिक | कृषिक अँप Krushik app

आजचा फळ पीक सल्ला ( केळी, आंबा)
केळी
कमी तापमानामुळे केळी पिकावर होणाऱ्या परिणामांची तीव्रता कमी करावयाच्या उपाययोजना
केळीची लागवड १.५x१.५ किंवा १.७५x१.७५ मीटर या शिफारशीत अंतरावर करावी. जास्त अंतरावर लागवड करणे टाळावे.
थंड वातावरणात केळी लागवड करणे टाळावे. लागवड शक्यतो ऑक्टोबरमध्येच पूर्ण करावी.
लागवडीच्या वेळेस बागेच्या चोहोबाजूने सुरु, नेपिअर, शेवरी इत्यादी वारा प्रतिरोधक वनस्पतींची दोन-तीन ओळींत दाट लागवड करावी. यामुळे बागेतील झाडांचे थंड वाऱ्यांपासून संरक्षण होते.
रासायनिक खतांच्या शिफारशीत मात्रा वेळापत्रकानुसार द्याव्यात. हिवाळ्यात केळी पिकास पालाश या प्रमुख अन्नद्रव्याची कमतरता पडू देऊ नये.
शक्य असल्यास बागेस रात्री किंवा पहाटेच्या वेळी ठिबक संचाने पाणी द्यावे.
जमिनीची जलधारणक्षमता वाढण्याकरिता पिकास शेणखत किंवा कंपोस्ट खत द्यावे. तसेच सेंद्रिय आच्छादन करावे. यामुळे ओलावा आणि जमिनीचे तापमान योग्य राखले जाते.
झाडाची लोंबणारी हिरवी निरोगी तसेच वाळलेली रोगविरहित पाने कापू नयेत. पाने खोडाभोवती तशीच लपेटून ठेवावीत. रोगग्रस्त पाने फक्त कापावीत.
वाढीच्या अवस्थेनुसार प्रतिझाड ०.५-१ किलो निंबोळी खत मातीत मिसळून द्यावे. यामुळे पिकास अतिरिक्त अन्नद्रव्ये उपलब्ध होतात. निंबोळी ढेपेमुळे मुळ्यांना इजा करणाऱ्या सुत्रकृमींपासूनही पिकाचे संरक्षण होते.
बागेमध्ये उसाचे पाचट, केळीची रोगविरहीत वाळलेली पाने, सोयाबीन भुसा अशा सेंद्रिय पदार्थांचा किंवा चंदेरी रंगाच्या पॉलिप्रॉपिलीनचे आच्छादन करावे. यामुळे जमिनीतील तापमान नियंत्रित राहते. तसेच जिवाणूंच्या संख्या वाढण्यास मदत होते.
तापमान १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी असल्यास, पहाटेच्या वेळी बागेच्या चोहोबाजूंनी ओला काडीकचरा व गवत जाळून धूर करावा.
आंबा
पालवी आणि मोहोर अवस्थेत असलेल्या आंब्यावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असल्यास आणि फवारणी घेणे आवश्यक असल्यास पावसाची उघडीप पाहून तसेच फवारणी द्रावणात स्टीकर मिसळून फवारणी करावी.
आंब्याचा मोहोर रोगाच्या प्रादुर्भावामुळे करपला असल्यास दुपारच्या वेळेस कडक उन्हामध्ये झाडावरील मोहोर झाडून घ्यावा. करपा रोगाच्या नियंत्रणासाठी अॅझॉक्सीस्ट्रोबीन (२३ एससी) ०.६ मि.लि. प्रतिलिटर पाण्यातून पालवी तसेच मोहोर अवस्थेत असलेल्या झाडावर फवारणी करावी.
पालवी अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुड्यांच्या प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. कोवळ्या पालवीचे किडीच्या प्रादुर्भावाकरिता निरीक्षण करावे. प्रादुर्भाव दिसून आल्यास, डेल्टामेथ्रीन (२.८ ईसी) ०.९ मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून संपूर्ण झाडावर तसेच खोडावर फवारणी करावी.
बोंगे फुटण्याच्या अवस्थेत असलेल्या आंब्यावर तुडतुडे व भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी, लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ईसी) ०.६ मि.लि. अधिक हेक्झाकोनाझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मोहोर फुटलेल्या बागेमध्ये तुडतुडे, मिजमाशी इत्यादी किडींचा तसेच भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने मोहोर फुलण्यापूर्वी, इमिडाक्लोप्रीड (१७.८ ईसी) ०.३ मि.लि. किंवा ब्युप्रोफेझीन (२५ एससी) २ मि.लि. अधिक हेक्झाकोनॅझोल (५ ईसी) ०.५ मि.लि. किंवा सल्फर (८० डब्ल्यूजी) २ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
(*मोहोर नुकताच फुलत असताना ते फळधारणा होईपर्यंत किटकनाशकाची फवारणी टाळावी. फवारणी करणे गरजेचे असल्यास बागेतील परागीकरण करणाऱ्या कीटकांवर होणारा परिणाम टाळण्यासाठी परागीकरणाचा कालावधी (सकाळी १०-१२) वगळून फवारणी करावी.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा अपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true