Get Mystery Box with random crypto!

फळबागा समूह विकासासाठी २०० कोटी उपलब्ध होणार सौजन्य | कृषिक अँप Krushik app

फळबागा समूह विकासासाठी २०० कोटी उपलब्ध होणार

सौजन्य : अॅग्रोवन
दिनांक : 08-Jun-21
पुणे : केंद्र शासनाने फलोत्पादन समूह क्षेत्रविकास कार्यक्रम (सीडीपी) देशभर लागू केला आहे. यात पहिल्या टप्प्यात नाशिक व सोलापूर जिल्ह्याचा समावेश असून, तेथील फळबागांच्या विकासासाठी २०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
एकाच वेळी अनेक फळपिकांवर भर देण्यापेक्षा नैसर्गिक वातावरणामुळे आधीपासून स्थिर झालेल्या पिकांचा क्षेत्रविकास करण्याचा हेतू ‘सीडीपी’चा आहे. नाशिकमधील द्राक्ष व सोलापूर भागातील डाळिंब पिकांचा यामुळे आणखी वेगाने विकास होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. या समूहातील फळपिकांचे निर्यातक्षम उत्पादन वाढविणे, मूल्य वृद्धी व विक्री व्यवस्थापनाची साखळी मजबूत करण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात १०० कोटी रुपये खर्च केले जातील.
रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे यांनी नुकताच या उपक्रमाचा आढावा घेतला. राज्याचे फलोत्पादन सचिव एकनाथ डवले व फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यावेळी उपस्थित होते. विविध राज्यांमधील दहा लाख शेतकऱ्यांना लाभ देणारे ५३ समूह तयार करण्याचे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. यात पहिल्या टप्प्यात देशात १२ समूहांचे काम पथदर्शक स्वरूपात सुरू करण्यास हिरवा कंदील देण्यात आला आहे.
‘‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा हेतू ‘सीडीपी’चा आहेच; पण याशिवाय निवडलेल्या समुहातील फळपिकाची निर्यात किमान २० टक्क्यांनी वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. देशातील ५३ समूहांमधील फळपिकांमध्ये एकूण गुंतवणूक दहा हजार कोटींच्या पुढे नेण्याची तयारी केंद्राची आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली.
‘सीडीपी’ उपक्रमात शेतकरी उत्पादक संस्थांना (एफपीओ) सामावून घेतले जाणार आहे. केंद्रीय कृषी सचिव संजय अग्रवाल यांनीही ‘सीडीपी’चा आढावा दिल्लीत घेतला. ‘‘या समूहांमध्ये राज्याच्या यंत्रणांनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे. या उपक्रमातून केवळ आर्थिक उलाढाल वाढवायची नसून फळांचे ब्रॅंडदेखील करायचे आहेत,’’ असे सचिवांनी स्पष्ट केले आहे.
३८ हजार हेक्टरवर फळबागा : दरम्यान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातून शेतकऱ्यांना यंदा ७० कोटी रुपये अनुदान देण्यात आले आहे. नव्या वर्षासाठी २३४.१४ कोटींचा कृती आराखडा केंद्र शासनास सादर करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्यात ३८ हजार २०७ क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे. त्याबद्दल फलोत्पादन मंत्र्यांनी कृषी विभागाचे अभिनंदन केले आहे. ठिबकसाठी यंदा ५१६.३२ कोटी अनुदान शेतकऱ्यांना दिले गेले आहे. यामुळे आतापर्यंत २५.२५ लाख हेक्टर क्षेत्र ठिबकखाली आले आहे.
पावणेचार कोटी रोपे उपलब्ध : राज्यात १४३ शासकीय रोपवाटिका आहेत. याशिवाय ५८ कृषी विद्यापीठाच्या ५८ व १०४२ खासगी रोपवाटिका असून, विविध फळपिकांची ३८० लाख कलमे, रोपे उपलब्ध आहेत. याशिवाय पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेतून ५०० रोपवाटिका तयार होणार आहेत.
महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेतील शेतमालाचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आजच कृषि विज्ञान केंद्र, बारामतीचे मोफत कृषिक अॅॅप पुढे दिलेल्या लिंक वरून त्वरित डाऊनलोड किंवा उपडेट करून घ्या.
https://play.google.com/store/apps/details?id=com.rtc.krushik&showAllReviews=true